सागरभाऊ आगळे यांची लोहार युथ फाउंडेशनच्या राज्य कार्यकारिणी संचालकपदी निवड
लोहार समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
लोहार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व युवक सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे सागरभाऊ आगळे यांची लोहार युथ फाउंडेशनच्या राज्य कार्यकारिणी संचालकपदी निवड करण्यात आली. श्रीक्षेत्र देवगड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली.
लोहार युथ फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष दिपालीताई रवींद्र विघवे तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या हस्ते सागरभाऊ आगळे यांना निवडीचे मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. उज्वला आगळे, नायब तहसीलदार राजेंद्र लाड साहेब, माजी राज्य उपाध्यक्षा शीतलताई खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात लोहार समाज बांधवांपर्यंत संघटनेचे विचार, योजना व हक्क पोहोचवण्यासाठी सागरभाऊ आगळे यांनी गेल्या काही वर्षांत भरीव कार्य केले आहे. युवक मेळावे, सामाजिक आंदोलन, उपोषण, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, वधू-वर मेळावे, अधिवेशने अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील तरुणाईला एकत्र बांधण्याचे काम यशस्वीपणे केले आहे.
तालुकाप्रमुख, जिल्हा संघटक, संपर्कप्रमुख, मध्य महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता थेट राज्य कार्यकारिणी संचालकपदी त्यांची निवड झाल्याने लोहार समाजात समाधान व्यक्त होत आहे. याशिवाय ते बारा बलुतेदार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष असून पोलीस मित्र संघटनेचेही सक्रीय कार्यकर्ते आहेत.
लोहार समाजातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संघटनेच्या राज्यस्तरीय जबाबदारीवर त्यांची निवड झाल्याने समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील काळात लोहार समाजासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

