लोहार युथ फाऊंडेशनमुळे समाजातील तरुणांना नवी दिशा; सामाजिक कार्यातूनच सक्षम राजकीय नेतृत्व घडते:- नेवासा नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले
लोहार युथ फाऊंडेशनमुळे समाजातील तरुणांना नवी दिशा
नेवासा (प्रतिनिधी)
लोहार युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातील तरुण एकत्र येत समाजहितासाठी जे संघटित, सकारात्मक आणि दिशादर्शक कार्य करीत आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद असून समाजाला नवी दिशा देणारे आहे. सामाजिक कार्यातूनच माणूस घडतो आणि त्याच कार्याच्या बळावर मी आज या राजकीय पदापर्यंत पोहोचलो, असे प्रतिपादन नेवासा नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता दोन दिवसीय संवाद मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संवाद मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते व लोहार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील तरुणांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता शिक्षण, सामाजिक बांधिलकी, सेवा आणि संघटन या माध्यमांतून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचा परिचय लोहार युथ फाऊंडेशनचे सहकार्याध्यक्ष प्रा. हर्षल आगळे यांनी करून दिला.नेवासा नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले,गटनेते महेश लोखंडे, नगरसेवक प्रवीण सरोदे यांचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे व राज्य उपाध्यक्ष नितेश लोखंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात डॉ. घुले यांनी, आपण अध्यक्ष असलेल्या समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून लोहार युथ फाऊंडेशनसोबत राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या संघटनांमधूनच भविष्यातील सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व तयार होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संवाद मेळाव्यात लोहार युथ फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या अनुभवांचा आदान-प्रदान करत संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी लोहार युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोहार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे सर तर आभार राज्य कार्यकारणी सदस्य सागर आगळे यांनी मानले.



